गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
वाशिम, दि. १९ (जिमाका) :
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करतांना शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. याविषयी मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश, नगरपालिका तसेच प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मंडपबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना भपकेबाजी नसावी.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू अथवा संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची अथवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतः व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल.
उत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुर्षणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंगचे) तसेच मास्क, सॅनीटायझर इ. स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये. नगरपालिका, नगरपंचायत, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रश्नाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी परिपत्रक अथवा प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुपालन करावे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.