• भंडारा जिल्हयासाठी 5 कोटी निधी
भडारा दि.04 : नागपूर विभागात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत वाटप तसेच मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयासाटी 16 कोटी 48 लाख 25 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. आजच भंडारा दौऱ्यावर असतांना वडेट्टीवार यांनी निधीची घोषणा केली व शासन निर्णय निर्गमित केला.
भंडारा, चंद्रपूर व नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली. त्यानुसार आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला. नागपूर विभागातील 6 जिल्हयातील मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना सहाय्य व मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता 8 कोटी 86 लाख 25 हजार रूपये व घराची अंशता: क्षती झालेल्या मदतीसाठी 7 कोटी 15 लाख व मदत छावण्या चालविण्यासाठी 47 लाख रूपये असे एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हयासाठी 5 कोटी, वर्धा 2 लाख 25 हजार, भंडारा 5 कोटी, गोंदीया 1 कोटी, चंद्रपूर 5 कोटी व गडचिरोली जिल्हयासाठी 46 लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. भंडारा दौऱ्यावर असतांना दिलेला शब्द श्री. वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.