कर्मचारी संपाचा फटका; प्राचार्य फोरमने परीक्षा समोर ढकलण्याची मागणी केली होती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची ऑनलाईन परीक्षा संकटात सापडली होती. गुरुवारपासून परीक्षा असताना विद्यार्थ्यांना अद्यापही परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नव्हते. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार असण्याचा अजब आदेश काढत विद्यापीठाने आपली जबाबदारी झटकल्याने प्राचार्य फोरमने आक्रमक होत परीक्षा पुढे ढकला अन्यथा जबाबदारी स्वीकारा, असा दम विद्यापीठाला दिला होता. प्राचार्य फोरमची मागणी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अखेर विद्यापीठाने १ ऑक्टोबरपासून पुढे होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
कर्मचारी संपाचा फटका; प्राचार्य फोरमने परीक्षा समोर ढकलण्याची मागणी केली होती
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून दोन दिवसांआधी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठवण्यात आले. ओळखपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेचा युजर आयडी आणि पासवर्ड राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो परीक्षेच्या किमान एका दिवसाआधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयातील कर्मचारी कामावर नाहीत. परिणामी, महाविद्यालयांकडून अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही. कर्मचारी संपामुळे महाविद्यालयांच्या कामावर मोठा परिणाम होत असताना विद्यापीठ संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयांवर कशी टाकते, असा सवाल करीत प्राचार्य फोरमने परीक्षाच समोर ढकला, अशी मागणी केली. याशिवाय विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या ईमेलवर परीक्षापत्र पाठवण्यात आले आहेत. मात्र, ते डाऊनलोड होण्यास बराच अवधी लागत आहे. करोनाच्या संकट काळात आणि कर्मचारी संप सुरू असल्यामुळे महाविद्यालयेही हतबल आहेत. त्यातच कर्मचारी संपामुळे विद्यापीठांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.