नागपूर - अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परिक्षेत येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत आहे. नागपूर विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या अॅपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्या अडचणी तत्काळ दूर कराव्या. शिवाय कुलगुरूंनी या सगळ्या बाबींवर स्वतः समाज माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. या मागणीसाठी आज (दि. 13 ऑक्टोबर) नागपूर अभाविपकडून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी येत्या तीन दिवसात दूर न झाल्यास कुलगुरूंना घेराव घालू, असा इशाराही अभाविपकडून देण्यात आला.
मात्र, त्या अॅपमध्ये अनेक अडचणी येत आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेच्या वेळेत ओटीपी मिळत नाही. त्यामुळे अनेकांना परिक्षेला मुकावे लागत असल्याचेही यावेळी अभाविपकडून सांगण्यात आले. सोबतच या सगळ्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक समस्येचा सामना करावा लागत आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. त्यांची फेर परिक्षा घ्यावी, अशी मागणीही अभाविपकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अडचणीच्या काळात कुलगुरूंनी स्वतः समाज माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. जेणेकरून परिक्षेबद्दलचे संभ्रम दूर होईल, असेही अभाविपने सूचविले आहे.