नागपूर ४३ टक्के विद्यार्थ्यांना दीड लाखपर्यंतचे पॅकेज
४३ टक्के विद्यार्थ्यांना दीड लाखपर्यंतचे पॅकेज
नागपूर विभागातही अभियांत्रिकी शिक्षणाला वाव; माहिती तंत्र शिक्षण विभागाचा दावा
. ४३ टक्के विद्यार्थ्यांना दीड लाखपर्यंतचे पॅकेज डॉ.राम निबुदे
नागपूर विभागातही अभियांत्रिकी शिक्षणाला वाव; माहिती तंत्र शिक्षण विभागाचा दावा
नागपूर : अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक शिक्षणासाठी विदर्भातील विद्यार्थी, पालक मोठय़ा संख्येने मुंबई आणि पुण्याला प्राधान्य देत असतात. मात्र, आता मुंबई, पुण्यातच नव्हे तर नागपूर विभागातही अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या दर्जेदार शिक्षण संस्था असून नामवंत शिक्षकांच्या जोरावर येथील ४३ टक्के विद्यार्थी दरवर्षी ४४ लाखांपासून दीड लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवून देश-विदेशातील नामवंत संस्थांमध्ये रुजू होत आहेत, अशी माहिती तंत्र शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी पत्रपरिषदेत दिली.
नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होत असून ४४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात १७ हजार १३६ जागांसाठी दरवर्षी प्रवेश होतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२०मध्ये ९ हजार२८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या ४४ महाविद्यालयात ४ हजार ३२७ शिक्षक असून यातील ८१३ शिक्षक हे आचार्य पदवीधारक असल्याचे डॉ. निबुदे यांनी सांगितले. या अनुभवी शिक्षकांच्या बळावर दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या निकालामध्ये वाढ होत आहे. यातील ३२ महाविद्यालयांनी ‘नॅक’चे मूल्यांकन केले असून अंतिम वर्षांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ८३ टक्के आहे. केवळ उत्तीर्ण होणाऱ्यांचा टक्का मोठा नसून दरवर्षी ११३३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येतात. मागील वर्षी अंतिम वर्षांच्या १३ हजार १९९ विद्यार्थ्यांमधून ५ हजार ७८६ म्हणजे ४३ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली. यात शासकीय अभियांत्रिकीसह काही संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ४४ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळवले. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाविषयी आणि विशेषत: विदर्भातील शिक्षण संस्थांविषयी असलेली नकारात्मकता चुकीची असून अभियांत्रिकीमध्ये आजही चांगली संधी असल्याचा दावा डॉ. राम निबुदे यांनी केला.
एकूण अभियांत्रिकी महाविद्यालय : ४४
एकूण प्राध्यापक : ४३२७
आचार्य पदवीधरक प्राध्यापक : ८१३
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी : ८३ टक्के
कॅम्पस प्लेसमेंटची टक्केवारी :४३.८३ टक्के