विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली (छायाचित्रे संग्रहित)
नागपूर : आठ दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा परिणाम शाळांच्या उपस्थितीवर जाणवत असून शहरातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे. महापालिका प्रशासनाने शाळा बंदचे आदेश दिले नसले तरी अनेक शाळांनी खबरदारी म्हणून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत न येता ऑनलाईन वर्गाचे तोंडी आदेश दिले आहेत. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थी मात्र इकडे भटकत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सध्यातरी पाठ दाखवली आहे. याउलट ग्रामीण भागातील महाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक आहे. शहरात गत आठ दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही शाळांनी आता तोंडी सूचना देत विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग घेण्यास सांगितले आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीचा करोना अहवाल सकारात्मक असल्यास पूर्ण शाळाच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांनीही खबरदारी म्हणून आपला मोर्चा पुन्हा ऑनलाईन वर्गाकडे वळवला आहे.