(छायाचित्रे संग्रहित)
अमरावती - बेरोजगारीच्या नैराश्यातून तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चेतन अमरलाल बेठे (वय-25, रा. परतवाडा, सध्याचा मुक्काम हरीहर नगर, धारणी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना धारणी येथील हरिहर नगर येथे गुरुवारी (ता.11) रोजी घडली.
चेतन आपल्या आई आणि दोन लहान भावंडांना सोबत घेऊन हरिहर नगरात राहत होता. त्याचे वडील अमरलाल बेठे हे धारणी येथील तहसील कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. परंतु, आठ वर्षांपूर्वी वडील अमरलाल बेठे यांचे एका दुर्धर आजाराने निधन झाले होते. वडिलांची छत्रछाया हरवल्यामुळे लहान वयातच चेतनच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.
अमर याने घरातील कर्ता पुरूष आणि वडिलांचा वारसाहक्क मिळावा म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी संबंधित कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता. त्याने वारंवार चकरा मारून पाठपुरावाही केला होता. मात्र त्याला कारकूनपदावरही नोकरी मिळाली नाही.
करोनामुळे झालेली बिकट परिस्थीती, आई आणि लहान भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी, त्यातच हाताला काम नाही, नोकरी मिळत नव्हती म्हणून तो नैराश्यात होता. अखेर त्याने आयुष्याला कंटाळून 11 मार्चला राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.