आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार - पालकमंत्री यशोमती ठाकूर (Amravti-Yashomati Thakur) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 24, 2021

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार - पालकमंत्री यशोमती ठाकूर (Amravti-Yashomati Thakur)


(छायाचित्रे संग्रहित)  

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वाआठ कोटी रूपये निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी रुग्णालयांच्या बांधकामांबरोबरच इतरही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. त्यानुसार निधी प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयासाठी नवी इमारत होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निधी उपलब्ध होण्याबाबत निवेदनही दिले होते. अस्तित्वात असलेली रूग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने उपजिल्हा रूग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना केली होती. आमदार बळवंतराव वानखडे यांनीही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाकडून पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमानुसार राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून अमरावतीतील अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत झाला आहे.

अचलपूर येथील 200 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयासाठी सुमारे सहा कोटी रूपये पहिल्या टप्प्यातील निधी वितरित झाला आहे. त्याचप्रमाणे, अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर 50 खाटांच्या रुग्णालयासाठी केंद्र व राज्य हिस्स्याचे मिळून सव्वादोन कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच दोन्ही रूग्णालयाचे काम सुरू होणार आहे.

Post Top Ad

-->