नवी दिल्ली - कामगारांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक योजनांची पूर्ण माहिती कामागारांना मिळतच नाही. काही योजना असतात ज्या कामगारांच्या खूप उपयोगाच्या असतात. कामगारांना त्याचा मोठा फायदा होतो. अशीच एक योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार देण्याची हमी देण्यात आली आहे. पण यासाठी संबंधित कामगारांना नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर विविध सुविधांचा लाभ मिळतो.
कामगारांना नोंदणी करण्यासाठी आणि 'लेबर कार्ड' बनवण्यासाठी काही निकष आहेत. यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असायला हवी. हे कार्ड फक्त गरीब प्रवर्गातील कामगारांच्या कुटुंबानाच दिलं जातं. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट http://www.uplabour.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे
कामगार कार्ड बनविण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ज्याच्या आधारावर कामगार कार्ड बनविता येईल. कामगार कार्ड बनविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड आहे. आधार कार्ड अनिवार्य आहे. याचा उपयोग करुन कामगार कार्ड तयार करता येतंकोणत्याही कुटुंबात कोणत्याही एकाच व्यक्तीचं कामगार कार्ड बनविण्यात येतं. त्यामुळे तुम्हाला सर्व महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील.
ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रं अपलोड करावी लागतात. कामगाराचे स्वतःचे बँक खाते असायला हवे. यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत पाठविली जाईल. मोबाईल नंबर असायला हवा जेणेकरून या योजनेच्या संदर्भात आपणास काही माहिती दिली जाईल किंवा पैसे जमा झाल्याचा ओटीपी पाठवला जातो. रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि कामगार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने एका वर्षात 90 दिवस काम केले तोच या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करू शकतो.
योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक राज्यात मिळत आहे. संबंधित राज्य सरकारांनी त्यासाठी विविध नियमावली बनवल्या आहेत. या नियमानुसारच कामगारांना लेबर कार्डसाठी अर्ज करावा लागतो. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कामगारांसाठी मोफत अन्न योजना चालू केली. त्यातही लेबर कार्डचा उपयोग झाला. या कार्डधारकांना 2 रुपये किलो दराने गहू मिळाले.