(छायाचित्रे संग्रहित)।
बुलडाणा, 27 मार्च : उन्हाळा सुरू होताच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई (Water Scarcity) जाणवू लागली आहे. यात बुलडाण्याचाही समावेश आहे. बुलडाणा तालुक्यातील हातेडी गावातही पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याचं चित्र आहे. या गावामध्ये पेयजल स्वराज योजना आहे खरी, मात्र ती केवळ शोभेची वस्तू बनली असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे पाणी मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी आता थेट ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले आहे. पाणी प्रश्नासाठी शेकडो महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत टाळे ठोकले आहे.
बुलडाणा तालुक्यातील हातेडी या गावात पाणी प्रश्न पेटला आहे. या गावामध्ये पेयजल स्वराज योजना केवळ नावापुरतीच आहे. त्यामुळे, गावात भीषण पाणी टंचाई असताना 1-1 महिना नळाला पाणी येत नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पाणी का मिळत नाही? याचा जाब विचारण्यासाठी आज शेकडो महिला हांडे घेऊन ग्रामपंचायतवर धडकल्या.
ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन गेलेल्या या महिलांनी पाणी प्रश्नासाठी याठिकाणी मोठा आक्रोश केला. इतकंच नाही तर चक्क ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना काय परिश्रम घ्यावे लागतात आणि किती दूर जावं लागतं याबाबत आपल्या भावना या महिलांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. तसंच आपल्या अडचणीही मांडल्या आहेत. पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत असल्यानं या महिलांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीवरच आपला मोर्चा वळवला