अवैध धंद्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील
APALA VIDARBH LIVE
नागपूर- पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. यात नांगरे पाटील अधिका-यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिका-यांना जबाबदार धरून निलंबन अथवा विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल. तसेच परिमंडळाच्या हद्दीत अवैध धंदे आढळल्यास पोलीस उपायुक्त आणि अपर पोलीस आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना नांगरे- पाटील यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या पोलिसांना पुन्हा जोमाने कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिल्याचे स्पष्ट होत आहे.
एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपहारगृह, मद्यालय, पब, कुंटणखाने, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, दारू, जुगार आदी अवैध धंदे सुरु राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे. तसेच अवैध धंदे 100 टक्के बंद करून त्यात गुंतलेल्या आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत सामाविष्ठ आरोपीवर प्रतिबंधात्काम कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. तसेच रात्रीची गस्त सक्षमपणे झाली पाहिजे, अशी सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिल्याचे नांगरे पाटील यांनी अधिका-यांना सांगताना दिसत आहेत.