( छायाचित्र संग्रहित )
पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक
मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90-95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत, तर काही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक वाहनं लाँच करणार आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत, आणि विशेष म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. देशातल्या एका शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इलेट्रिक बाईक्स खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या शहरातील विविध डिलरशिप्सकडील इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक झाली आहेत.
पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे काही शहरांमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ई-बाईकची कमतरता भासू लागली आहे. म्हणजे लोकांना आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अधिक रस आहे. नागरिक इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि थ्री व्हीलर विकत घेण्यासाठी प्रतीक्षेत (वेटिंग पीरियड) आहेत. परंतु काही ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक झाली आहेत.फेब्रुवारीपासून ईलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ वाहन विक्रेते (डीलर) आशिष अग्रवाल म्हणाले की, अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात आमच्या कंपनीने एक ऑनलाइन जाहिरात मोहीम राबविली होती, ज्यामुळे आम्हाला आपला व्यवसाय वाढविण्यात मदत झाली. नंतर, पेट्रोलचे दर वाढत असताना, विशेषत: गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर आणि ऑटोबाबतची चौकशी वाढू लागली आहे. ते पुढे म्हणाले की, 15 फेब्रुवारीपूर्वी माझ्याकडे 22 इलेक्ट्रिक बाइक्स होत्या. नंतर मी आणखी 40 दुचाकी मागवल्या. या सर्व 62 बाईक 19 फेब्रुवारीपर्यंत विकल्या गेल्या. 3 मार्चपूर्वी एकूण 37 इलेक्ट्रिक बाइक्स बुक करण्यात आल्या आहेत.
ई-बाईक / स्कूटरची विक्री वाढली अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ते एका महिन्यात सुमारे 15 इलेक्ट्रिक बाईक विकत असत, आता दरमहा सुमारे 100 ई-बाईक / स्कूटरची विक्री झाल्याने त्यांची विक्री अनेक पटींनी वाढली आहे. असाच ट्रेंड आता पंजाबच्या लुधियाना या शहरातही दिसून आला आहे.