छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी SHIVAJYANTI NIYMAVLI - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, March 28, 2021

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी SHIVAJYANTI NIYMAVLI

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

( छायाचित्र संग्रहित )

वाशिम, दि. २८ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा होणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी साथरोग अधिनियम १८९७ अन्वये वाशिम जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) २०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यावर्षी कोविड- १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव (तिथीनुसार) साजरा करण्यात यावा. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून जास्तीत जास्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->