वेळेवर बस सोडण्याची मागणी : आगारप्रमुखांनी दिले आश्वासन
शाळेत ये-जा करण्यासाठी वेळेवर एसटीबसेस येत नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या काही गावातील विद्यार्थ्यांनी खामगाव एसटी आगारावर मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांकडे आपले गाऱ्हाणे मांडत वेळेवर बसेस सोडण्यात याव्या अशी मागणी केली.दैनिक आपला विदर्भ ई पेपर 13 अॉगस्ट 2023
खामगाव तालुक्यातील विहिगाव येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयात आसपासच्या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. आवार, खेड, उमरा, नागापूर, किन्ही महादेव या गावातील अनेक विद्यार्थी एसटी बसने ये-जा करुन या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. सकाळी बस उशीरा आल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो आणि सायंकाळी बस वेळेवर न आल्यास विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बराच विलंब होतो. बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. अनेकवेळा बस सायंकाळी बऱ्याच उशिराने आल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास रात्र होते. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी खामगाव गाठून मोर्चा काढला. खामगाव बस स्थानकावरुन पायी निघालेला हा मोर्चा एसटी आगारात पोहचला. याठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आगार प्रमुखांना दिले. विद्यार्थ्यांची समस्या समजून आगारप्रमुखांनी तत्काळ दखल घेत आज पासूनच वेळेवर बसेस येतील असे आश्वासन दिले.